माझा मराठीतला पहिला ब्लॉग :)
चेन्नईला येउन मला आता चार आठवडे होतील.. अर्थात कुठल्याही शहराबद्दल वक्तव्य करण्यासाठी, किंवा मत बनवण्यासाठी म्हणू हवं तर, चार आठवडे हा काही फार काळ नाही. पण कसं आहे, की तुमचा मेंदू ताजा असताना, कुठल्याही प्रकारचे संस्कार त्यावर झालेले नसताना, जे ठसे त्यावर उमटतात, ते तुम्ही जुने झाल्यावर उमटत नाहीत. नवीन शहरात गेल्यावर तुम्हाला जर लगेच नोकरी धंदा असेल, तर मग तुम्ही खूपच लवकर जुने होता, आणि रहाट गाडग्याला स्वतःला जुंपून घेता. मी सध्या सुशिक्षित बेकार या गटातली असल्याने, मला तसा स्वतःला नवं ठेवण्यासाठी पुष्कळच स्कोप आहे. :)
चेन्नईच नाव ऐकल्यावर नाकं न मुरडणारे लोक मला फार कमी सापडले. आणि केवळ महाराष्ट्रीय नव्हे तर अगदी मूळ तमिळ लोक सुद्धा. ते घाण आहे, गरम आहे, अतिभयानक उन तिथे असतं, तिथे रस्त्यावर अस्वच्छता आहे, लोक हिंदी मुळीच बोलत नाहीत, तमिळ शिवाय पर्याय नाही, त्या शहराला असा एक मेट्रो चा फील नाही, डास तुम्हाला फाडून खातील, इ इ अनेक गोष्टी मी ऐकल्या. यातल्या अनेक गोष्टी अंशतः का होईना खऱ्या आहेत देखील, पण तरीही चेन्नईला स्वतःचं म्हणून एक व्यक्तिमत्व अर्थातच आहे, आणि ते व्यक्तिमत्व शोधण्यासाठी चार आठवडे हा कमी काळ असला, तरी काही ठसे, किंवा खुणा उमटवायला तसा पुष्कळ काळ आहे. त्यातली एक सतत जाणवत राहणारी खूण इथे लिहावी यासाठी हा ब्लॉग प्रपंच!
चेन्नईत, दैनंदिन आयुष्यावर स्थानिक संस्कृतीचा जाणवेल इतका प्रभाव आहे. मला कल्पना आहे, हे वाक्य अगदीच जनरल आहे, मात्र ज्या विविध गोष्टी पहिल्या, त्याच्या सगळ्याच्या मुळाशी हे एक समान सूत्र आहे,असं जाणवतं.
तमिळला पर्याय नाही वगैरे उक्त्या काही अंशी खऱ्या आहेत. बहुसंख्यांना इंग्लिश येतं हे ही तितकाच खरं आहे. मात्र : तुम्ही कुठेही जा, समोरचा माणूस तुमच्याशी बोलताना तमिळ मध्ये बोलायला सुरु करतो. तो रिक्षा वाला असेल, बस कंडक्टर असेल, भाजीवाला असेल, डॉक्टर असेल, दुकानदार असेल, रस्त्यावर पत्ता विचारणारा माणूस असेल, वेटर असेल, किंवा अन्य कोणी. तमिळ इल्ले हे एकदा तुम्ही सांगितलत किंवा तुमच्या मक्ख चेहऱ्याने त्याच्या लक्षात आलं, कि तो इंग्लिश मध्ये बोलेल किंवा बोलण्याचा प्रयत्न करेल. (रिक्षावाला असेल तर तुम्हाला आणखी लुबाडेल!) पण सुरुवात तमिळ मध्येच. अर्थात दक्षिणेकडली राज्यं भाषेबाबत कट्टर आहेत, हे आपण ऐकून आहोत. पण बंगलोर मध्ये तरी हिंदी बोलणं बरंच सापडतं. इथे मात्र, "तुम्ही आमच्या राजधानीत आहात, आमच्या भाषेला प्राधान्य आहे", हे कोणी काही न बोलता जाणवतं. भाषा हा शेवटी अभिव्यक्तीचा मार्ग असला, तरी भाषेतून संस्कृती कितपत हाडीमाशी रुजलीय याचं दर्शन होतं. सगळ्यात आश्चर्य कुठे वाटतं, तर मेनलेंड चायना सारख्या उच्चभ्रू ठिकाणी सुद्धा, मला अभिवादन तमिळ मध्ये केलं गेलं!
हॉटेल वरून एक वेगळा मुद्दा आठवला. इडली, डोसा, पोंगल ह्या सगळ्या मूळ इथल्याच गोष्टी. त्या लोकांनी इथे खाणे यात काहीच आश्चर्य नाही. (महाराष्ट्रात किती हॉटेल्स तुम्हाला पोहे आणि मिसळ देतात? पण ते जाऊ दे ) केळीच्या पानावर हे पदार्थ अनेक ठिकाणी तुम्हाला वाढलेले पाहायला मिळतात. मुद्दा तो देखील नाही. खाऊन झालं, की हे पान दुमडतात. ते खालून वर अश्या विशिष्ट पद्धतीनेच दुमडायचं असतं,कारण श्राद्ध वगैरे गोष्टींना ते उलटं दुमडल जातं! आणि हि गोष्ट मोठ्यापासून लहानांना माहीत असते! पाहून खूप आश्चर्य वाटलं, की ही तशी सो कॉल्ड धार्मिक/सांस्कृतिक गोष्ट रोज अवलंबली जाते. आणि त्याचं कारण असं की तिच्याकडे धार्मिक गोष्ट म्हणून न बघता रोजच्या आयुष्याचा एक साधा भाग म्हणून बघितलं जातं. भातासोबत वरण खाण्या इतका साधा !
एका बाबतीत माझ्याशी बरेच लोक सहमत होतील, ते म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्रं, आणि त्यातही टाइम्स, हे स्थानिक संस्कृतीला धार्जिणे कधीच नव्हते आणि नसतात. पुणे टाइम्स मध्ये तुमचा वेडिंग ड्रेस पांढरा शुभ्र कसा ठेवावा याबद्दलचे लेख, किंवा (तुरळक अपवाद वगळता), साहित्य-कला-संगीत म्हणून मराठी गोष्टींना खिजगणतीतही न घेणं हे अतिशय कॉमन आहे. मी चेन्नईला आले, तेव्हा पोंगलला १० दिवस होते, आणि मार्गळी (मार्गशीर्ष महिना) साजरा करणं जोरात चालू होतं. अनेक सुंदर शास्त्रीय गायन, अभिजात नृत्याचे कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, साड्यांचे सेल, गजरे आणि फुलांची सजावट, पोंगलच्या नवनवीन रेसिपी, दीपमाळा उजळलेली मंदिर, तमिळ फिल्म स्टार्सच्या शुभेच्छा देणं,हे सगळं चालू होतं, आणि मला हे समजण्याचा एकमेव स्रोत म्हणजे चेन्नई टाइम्स! आपण तमिळ पेपरच वाचतोय असं वाटावं इतका 'तमिळ'पणाने तो ओसंडून वाहात होता! सार्वत्रिक उत्साहाच्या बाबतीत आपल्या गणपतीशी याची तुलना करता येईल, पण ते १० दिवस सुद्धा पुणे टाइम्स इतका मराठीपणाने ओसंडून वाहताना मला कधीच दिसलेला नाही. वाचकांच्या मनात संस्कृतीच इतकं प्रेम असल्याशिवाय, भलेही ते अव्यक्त का असेना, हा पेपर नक्की हे करणार नाही याबद्दल मला खात्री आहे!
सगळ्याच गोष्टी स्तुतीजन्य आहेत असं नाही. केवळ मुलांची किंवा मुलींची शाळा कॉलेज इथे सर्वत्र आहेत. को-एड फार कमी. झालंच तर बस मध्ये पुरुषाच्या शेजारी जागा रिकामी असली तरी बाईने तिथे न बसणं हे देखील सर्वत्र! (मुंबईत राहिल्यावर हा महामूर्खपणा आहे असं वाटतं) पण हे देखील त्यांच्या संस्कृतीतल्या कर्मठ पणाला धरून आहे.
भाषा, सणवार,परंपरा आणि धर्म म्हणजे केवळ संस्कृती नाही. मग नेमकं काय?संस्कृतीच्या अनेक व्याख्या आहेत. समाजशास्त्रानुसार माणसाने निर्माण केलेलं काहीही म्हणजे संस्कृती. प्रत्येक समूहाने आपापली संस्कृती निर्माण केली. जागतिकीकरणाने कदाचित सगळ्याच संस्कृती लयाला जाताहेत. पण त्यात काही थोडं आपलं जपलं जावं अशी इच्छा असेल, तर ते दैनंदिन जीवनात आणावं लागतं. पुस्तकात ठेवून ते आणखी लवकर लयाला जातं. त्यात काही बाबतीत तमिळ लोक यशस्वी झालेत. अर्थात सगळ्याच एतद्देशीय लोकांसारखी आमची संस्कृती बुडाली अशी त्यांची ओरड असेलच, पण मुंबईसारख्या संस्कृतीशून्य शहरात राहिल्यावर मला इथे जरा बरं वाटलं. माझे निष्कर्ष चुकीचे असतीलही. किंवा अपुरे देखील असतील. पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, ही फर्स्ट इम्प्रेशन्स आहेत. चेन्नईच व्यक्तिमत्व ओळख्ल्यानंतर ती बदलतीलही. तोवर यावर विचार करायला काय हरकत आहे?
काही नाही तरी विचार करणं ही मराठी संस्कृती नक्की आहे! :D