चेन्नईला आल्यापासून पोन्डिचेरी ला जायचं मनात होत. आमचे एक समवयस्क नातेवाईक-कम-मित्र- हर्षद आणि रश्मी- असे औरोवील ला राहतात. ते अनेक काळ बोलावतायत. पण ते काही जमत नव्हतं. अर्थात मध्ये एकदा मित्र मंडळी आली असताना त्यांना घेउन गेलो होतो- पोन्डी, महाबलीपुरम, वगैरे असे. पण निवांतपणे केवळ ऑरो विल मध्ये जाऊन राहायचा काही योग जमला नव्हता. दोन आठवड्यांपूर्वी एक दिवस मात्र हर्षद आणि रश्मी ला फोन केला, आणि दुसऱ्या दिवशी परस्पर ऑफिस मधून लाल डब्ब्यात बसून मी औरोवील ला रवाना झाले!
ते ३६ तास फार म्हणजे फार वेगळे आणि सुंदर गेले. चेन्नई ला किंवा पुण्यालाही मी कधी करत नाही अशा अनेक गोष्टी केल्या,पाहिल्या, आणि चित्त प्रसन्न करून आले. ऑरोविल बद्दल बऱ्याच लोकांना विशेष माहिती नाही, केवळ ऐकीव माहितीवर औरोवील बद्दल मत बनवणारे अनेक लोक मला आत्ता पर्यंत भेटले. त्यात ऑरो विल म्हणजे अरविंद आश्रमाचा एक भाग ते एक हिपी लोकांचं गाव असे अनेक समज मला आढळले. फार नवीन गोष्टी काही मी सांगत नाहीये, पण निदान वस्तुस्थिती ला- एक नवीन कल्पना म्हणून- आहे तसं लोकांसमोर ठेवण्यासाठी हा प्रपंच.
ऑरो विल ही एक प्रायोगिक तत्वावर उभारलेली वस्ती आहे. किंवा गाव म्हणू. श्री अरविंद सोसायटी ने ते १९६८ साली सुरु केलं.मीरा अल्फास्सा, उर्फ मदर- अरविंदांच्या अध्यात्मिक शिष्या/उत्तराधिकारी/ सहचरी- यांच्या पुढाकारातून त्याची उभारणी सुरु झाली. त्यांनी ऑरो विल ची आदर्श कल्पना कशी मांडली?
तर त्यांच्या मते ऑरो विल हि एक प्रायोगिक, वैश्विक वस्ती आहे. (experimental, universal township). या वस्तीत दुनियेतले सर्व स्त्री पुरुष, त्यांच्या राष्ट्, वंश, वर्ण, आणि सर्व राजकारणाच्या पलीकडे जाऊन, एकोप्याने राहतील. या वैश्विक वस्तीने पुढे जाऊन अखेर मनुष्यजातीची उन्नती साधावी, अशी त्यातून अपेक्षा होती. सुमारे ५० हजार लोकांसाठी ही वस्ती असावी, ज्यात सर्व देशातले लोक मुक्तपणे राहतील अशीही मूळ योजना होती.. या प्रयोगाला भारत सरकारने पूर्णतःपाठींबा दिला. झालाच तर, युनेस्कोने देखील १९६८ पासून ४ वेळा आत्ता पर्यंत त्याला पाठिंबा घोषित केला. युनेस्कोच्या सगळ्या सभासद देशांना युनेस्को ने हे आवाहन केलं, की ऑरो विल मध्ये वास्तव्यास या, या प्रयोगात सामील व्हा.
आता हे सगळं बोलायला आणि ऐकायला अति मधुर आणि आदर्श असलं तरी एक गाव उभारायचं आणि ते चालवायचं म्हणजे त्याला काहीतरी योजना आणि पद्धत हवी.औरोविल ला देखील ती आहे. त्याला एक शासन व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेचे नियम कायदे कानू आहेत, स्वतःची अशी एक अर्थ व्यवस्था आहे, काही मूळ तात्विक मुद्दे पाळावेत अशी अपेक्षा आहे, मात्र तरीही तुम्हाला हव्या त्या गोष्टी करायचा मुक्त स्वातंत्र्य बऱ्याच प्रमानात आहे.
औरोविल ची शासन व्यवस्था ऑरो विल फाउंडेशन ही एक समिती बघते. ही समिती बऱ्यापैकी भारत सरकारच्या आधीपत्याखाली आहे.मात्र दैनंदिन कामांचे अधिकार, आणि अर्थातच जबाबदारी ही बऱ्यापैकी सामान्य ऑरो विल नागरिकाकडे असते. working committee आणि auroville foundation अश्या इथल्या काही मुख्य समित्या.समितीच्या कामात उतरंड नसते, असं या समितीचा दावा आहे. ऑरो विल च्या नागरिकांपैकी, कोणीही त्या समितीचा हिस्सा असू शकतो, आणि काम बघू शकतो. काम करणारच असा निश्चय मात्र पक्का हवा. पक्षीय राजकारणाला ऑरो विल चा पूर्ण विरोध आहे. तुम्ही राजकीय पक्षाचे सदस्य असणं अपेक्षित नाही. कारण राजकारणाने समाजात फूट पडते असं त्यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट. ऑरो विल मधील सर्व मालमत्ता, जमीन, इमारती किंवा इतर, ही ऑरो विल फाउंडेशन च्या मालकीची आहे. त्यावर कुठल्याही व्यक्तीची मालकी नाही. म्हणजे तुम्ही ऑरो विल मध्ये गेली ५ वर्ष एक घर बांधून राहत असाल, पण ते घर तुमच्या मालकीचं नाही. त्याची मालकी ऑरो विल ची असते! ऑरो विल मध्ये बरीच छोटी व्यावसायिक युनिट्स आहेत. सर्व प्रकारची. छोटे कारखाने, कन्सल्टन्सी, अभियांत्रिकी उद्योग, हस्तोद्योग, आणि बरेच. ऑरो विल ही वस्ती ही आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करायची असं औरोवील चा मानस आहे, आणि त्यामुळे त्या युनिट्सचं तिथे असणं महत्वाचं आहे.
पुढला मुद्दा येतो अर्थातच पैशांचा. या दोघांनी त्याबद्दल इंटरेस्टिंग माहिती दिली. औरोवील चालवायला लागणाऱ्या पैशांचा काही भाग हे भारत सरकार auroville foundation ला देतं. शैक्षणिक किंवा इतर विकासकामांसाठी हा पैसा मुख्यतः वापरला जातो. शिवाय ऑरो विल च्या आतली जी व्यावसायिक युनिट्स आहेत, छोट्या कंपन्या, ते त्यांच्या उत्पन्नातला ३३ टक्के भाग ऑरो विल ला देतात. शिवाय देश विदेशात पसरलेल्या चाहत्यांकडून, सुहृदांकडून, NGO कडून देखील पुष्कळ देणग्या येतात. आणि शिवाय हे सोडून ऑरो विल च्या नागरिकांने देखील काही मदत करावी अशी अपेक्षा असते. त्यात रोख रक्कम, वस्तू किंवा काम या स्वरूपात तुम्ही आपली मदत देऊ शकता. हर्षद आर्किटेक्ट आहे. तो तिथल्या एका कंपनीत काम करतो. त्या कंपनीच्या उत्पन्नातला ३३ टक्के वाटा कंपनी ऑरो विल ला देते. रश्मी एका सोलर टेक्नोलॉजी कंपनीत काम करते. झालंच तर ती सकाळी २ तास ऑरो विल च्या एका प्राथमिक शाळेत जाते आणि शनिवारी-रविवारी मातृ मंदिर च्या धुलाई केंद्रात देखील काम करते! समजा तुम्ही ऑरो विल चे नागरिक झालात, आणितुमच्या कडले सर्व पैसे संपले, तर काय असा प्रश्न मी अर्थातच त्या दोघांना विचारला. त्यावर बेसिक गरजा भागतील अशी व्यवस्था ऑरो विल फाउंडेशन करतं असं मला कळलं.
तुम्हाला ऑरो विल मध्ये येऊन कंपनी काढायचीय-खुशाल काढा. अर्थात त्या auroville foundation ची परवानगी घेउनच, आणि ऑरो विल चं नागरिकत्व घेउनच म्हणा. पैसे गुंतवायला मात्र ती एकदम बेकार जागा आहे. कारण जागा घेऊन त्यावर आपलं मालकी हक्क प्रस्थापित करणे अशी मुळात कल्पनाच नसल्याने, investors ना काही गम्य नाही.
हर्षद आणि रश्मी चं दैनंदिन आयुष्य मात्र शहरापेक्षा बरंच वेगळं आहे. त्यांनी अजून औरोवील चं नागरिकत्व घेतलं नाहीये. त्यामुळे ऑरो विल ने त्यांना जमीन दिलेली नाही. ते एका वेगळ्या घरात राहतात- खाजगी घरात-भाड्याने. त्यांच्या घरात टीव्ही नाही. बेसिन नाही. पेपर येत नाही. वीज असली तर असते, नाहीतर आनंद. फोने नाही. इंटरनेट चं प्रश्नच नाही.जवळ केवळ टपरी सदृश दुकान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी नाही. झालंच तर मध्यंतरी 'थाने' चक्रीवादळाने तिथे ४० टक्के झाडं पडली.
पण ते खूश आहेत. त्याचं काम चांगलं आहे. आणि शिवाय त्यांना एक जीवनाचा वेगळा अनुभव मिळतोय. १० ते ५ असं ऑफिस करून ते ५- १० ला घरी येतात. आल्यावर संगीत. हर्षद चं वादन आणि गप्पा. रोज रात्री मेन बिल्डिंग पासच्या थिएटर मध्ये एक सिनेमा असतो. कुठल्याही भाषेतला जगभरातल्या. ते तो अनेकदा बघतात. ओपेन एअर थिएटर ला जगभरातले नाटक, नृत्य, कविता, साहित्य, चित्र-शिल्प वाले कलावंत- वेडे वर्षभर सादरीकरण करत असतात. ते त्याचा आस्वाद घेतात. आपापली वाद्ये घेऊन,जवळच पोन्डीचेरी ला जाऊन १५- २० जण जामिंग करतात. मधूनच पवनचक्की वर फिरायला जातात. त्यांच्या अंगणात मोर येतो. ते गडद अंधारात ऑरो विल च्या रस्त्यांवर, जिथे भयाण झाडी आहे, तिथे पायी फिरायला जातात. आणि जगभरातल्या अनेक देशांचे त्यांचे मित्र मैत्रिणी आहेत. त्यात मग येतात मूळचा फ्रेंच असलेला कमाल ड्रमर सुरेश, त्याच्या ऑफिसातले कोरियन सहकारी, रस्त्यात भेटणारी जर्मन बाई, कामवाली तमिळ बाई, आणि इतर- हे केवळ काही नमुने, जे मला देखील भेटले.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असेलच की हे आदर्शवादी आयुष्य आणि अति आदर्शवादी गाव आहे.आहे. किंवा दोन दिवस जगायला बरं आहे. रोज काही जमणार नाही. मी नाही म्हणत नाही. आपल्या त्या त्या वेळच्या गरजा आणि अपेक्षा यावर कुठला आयुष्य चांगलं ते ठरत असतं. त्यामुळे त्यावर नो कॉमेंट्स. ऑरो विल मधलं शिक्षण, कला, विकासकाम आणि मातृ मंदिर यावर पुढल्या भागात..
1 comment:
Awesome Info...Keep writing
Post a Comment