Pages

Sunday, August 26, 2012

ऑरोविल- भाग २



गेल्या  पोस्ट मध्ये ऑरो विल बद्दल थोडं लिहिलं होतं. आज त्याच्याच पुढची काही माहिती.ऑरो  विल मधल्या मातृ मंदिराचा फोटो पुष्कळ लोकांनी पाहिलेला असतो. मातृ मंदिर हा ऑरो विलचा आत्मिक केंद्रबिंदू आहे. त्यात नेमकं काय आहे? ते इतर मंदिरा सारखं मंदिर नाही, किंबहुना कुठल्याच धार्मिक प्रार्थना स्थळा सारखं नाही. ती एक ध्यान करायची जागा आहे असं आपण म्हणू. अगदीच तात्विक शब्दात सांगायचं तर आपला ‘आतला आवाज ‘ ऐकण्याची ती जागा आहे. मातृ मंदिरात आत पूर्ण म्हणजे पूर्ण शांतता पाळली जाते. तुम्ही आत गेलात की वर चढत जाऊन एका आणखी मुख्य खोलीत प्रवेश करता. त्याला इनर चेंबर म्हणतात. तिथे मध्यभागी एक पृथ्वी गोला सदृश स्फटिक आहे, ज्यावर छतातून थेट सूर्यकिरण पडतात. त्यापाशी तुम्ही बसून सुमारे अर्धा तास ध्यान करावं अशी अपेक्षा असते. तिथे भजन करणे, श्लोक म्हणणे, प्रदक्षिणा, लोटांगण घालणे अश्या कुठच्याही धार्मिक गोष्टी आणि हालचाली अपेक्षित नाहीत. हास्य विनोद, गप्पा, टवाळक्या, किंवा उगाचच शांतता भंग करणाऱ्या गोष्टीना पूर्ण मज्जाव आहे. इच्छुकांसाठी मातृ मंदिराच्या व्हिजिट रोज सकाळी आयोजित केल्या जातात, मात्र त्याला आधी वेळ घ्यावी लागते,इतकंच.


मातृ मंदिराचा इतिहास मोठा रंजक आहे मात्र. मदर यांनी जेव्हा ऑरो विल ची संकल्पना मांडली, तेव्हा ही जमीन जवळपास पूर्णतः पडीक होती. १९६८ साली ऑरो विल चं औपचारिक उद्धाटन झालं. भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या आणि जगातल्या प्रत्येक देशातल्या तरूण प्रतिनिधींनी याला हजेरी लावली. त्यांनी स्वतःबरोबर त्या त्या ठिकाणची माती आणली आणि तिथे ती अर्पण केली. या नियोजित वसाहतीचा भौगोलिक केंद्र बिंदू हा एक वटवृक्ष ठरवला गेला. (सध्या मातृ मंदिराच्या आवारातच हा वटवृक्ष आहे.) या मातृ मंदिराच्या भोवती १२  बागा असतील, आणि अखेर या बागांभोवती एक तलाव असेल, असं डिझाईन देखील ठरवलं गेलं. 


मातृ  मंदिराच्या आवारातला तो वटवृक्ष -सध्या- the banyan. 

पुढल्या २ वर्षात स्थानिक कलाकारांच्या मदतीने या मातृ मंदिराचा ढाचा ठरला. १९७० मध्ये रॉजर अंगर या फ्रेंच आर्किटेक्ट ला अखेर हे काम सोपवण्यात आलं. पुढील अनेक वर्षात त्या ढाच्यात बदल होत राहिले. १९७१ ला जेव्हा बांधकाम सुरु झालं तेव्हा फक्त स्थानिक ऑरो विल च्या नागरिकांनी कामाला सुरुवात केली. पण नंतर मजूर बोलावले गेले. बागांच काम सुरु झालं. नोव्हेंबर १९७३ ला पहिल्या मूळ चार आधार स्तंभांच बांधकाम संपलं आणि मदर चं देहावसान झालं. हे मंदिर पूर्ण व्हायला पुढली ३५ वर्ष जावी लागली. मूळ तो मंदिराचा भव्य गोल पेलणारे खांब, इनर चेंबर, मंदिरचा सोनेरी पृष्ठभाग नंतर वातानुकूलन व्यवस्था,त्या साठी सौर उर्जा संयंत्रे, आतमधली कार्पेट, हे पूर्ण करत करत अखेर मे २००८ मध्ये ते मंदिर आता आपल्याला दिसतं त्या स्वरूपात आलं. अर्थात बागांची कामे अजून चालू आहेत, त्याला काही काळ लागेल. मात्र तुम्हाला आतला आवाज ऐकायची इच्छा असो, व नसो, मातृ मंदिर हे अवश्य बघण्यासारखं आहे, हे नक्की.
कम्युनिटी ही एक ऑरोविल मधली संकल्पना मला आवडली. ऑरो विल मधली नागरिक हे अनेक कम्युनिटी मध्ये विभागले गेले आहेत. आपण सोसायटी मध्ये राहतो तसंच. पण ह्या सोसायटी या साधारण समान आवडी, जगण्याच्या समान पद्धती यावर ठरवल्या जातात. तुम्ही तुमच्या सार्वमताने कम्युनिटीचं नाव ठरवायचं. पण एका कम्युनिटी मध्ये सरासरी १०-१२ कुटुंबच असतात. यंत्र, verite, , aspiration, साधना फॉरेस्ट, अग्नी जात, अशी अगदी वेगवेगळी, आणि संस्कृतीची प्रातिनिधिक नावे या कम्युनिटीज ची आहेत. सगळ्या कम्युनिटी आकाराने सारख्या नाहीत. काही प्रचंड मोठ्या आहेत, (इथल्या मानाने) काही अगदीच २ कुटुंबांच्या आहेत. काही कम्युनिटी चे स्वतःचे हॉल आहेत, कार्यक्रम करतात, एकत्र काही उपक्रम करतात. त्यांनी देखील काही न काही स्वरूपात ऑरो विल ला मदत करावी, असं अपेक्षित असतं. एप्रिल २०१२ च्या मोजणी नुसार ऑरो विल च्या नागरिकांची संख्या होती सुमारे २५००. आणि साधारण ३५ देशांतले हे लोक आहेत! Auroville international ही जागतिक संस्था २४ देशांमध्ये आहे.आणि त्या त्या ठिकाणी ऑरोविल चा प्रसार अथवा मार्गदर्शनाच काम ही संस्था करते.


तुम्ही ऑरोविलला राहता म्हणजे बऱ्याचश्या जंगलात राहता हे खरं असलं, तरी रानटी वातावरण मात्र तिथे अजिबातच नाही! शारीरिक शिक्षण,व्यायाम, कला, आरोग्य सेवा, असे अनेक उपक्रम इथे ‘पीतंग’ कल्चरल सेंटर मध्ये चालतात. आता तुमच्या माझ्या सारखे सामान्य लोक ऑरो विल मध्ये जाऊन राहू शकतात का? तर अर्थातच याचं उत्तर हो असं आहे, हे आपण पाहिलं. मग यांच्या पोटा पाण्याची सोय? तर ती बहुतांश ऑरो विलच्या व्यावसायिक युनिट्स मध्ये काम करून लागते. तुमच्या मुलांच्या शिक्षणाचं काय? अर्थातच ऑरो विल मध्ये शाळा आहेत. एकच नाही, पुष्कळ आहेत. रश्मी त्यातल्याच एका शाळेत सकाळी दोन तास जाते. आम्ही तीही शाळा बघून आलो. आपल्याकडे  टिपिकल प्रायोगिक शाळा असतात, तशीच आहे. एका इयत्तेचा एकाच वर्ग. सकाळी ८ ते दुपारी ३ शाळा. ती मुलं सर्व विषय शिकतात, पण भाषा, कला आणि खेळ यांना काकण भर अधिक महत्व दिलं जातं. या मुलांच्या वर्गात सगळ्या देशातली मुलं असतात आणि त्या सगळ्यांनाच इंग्लिश येतं असं नाही. मग आधी त्यांना इंग्लिश शिकवलं जातं! आणि तरीही नाही समजलं तर रश्मी सारख्या ताई असतातच शंका विचारायला. ९ मुलांमागे एक शिक्षक हे प्रमाण देखील मला अतिशय आदर्श वाटलं. कॉलेज मात्र अजून ऑरोविल मध्ये नाही. अर्थात ऑरो विल ही वसाहत देखील अजून पूर्णत्वाला गेली नाही. मूळ संकल्पनेप्रमाणे अजून अनेक लोक इथे यायचेत, अजून बराच विकास व्हायचाय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक देखील.


एकूणच तुम्ही मूळचे कुठलेही असा, इथे येऊन राहणं शक्य आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी, एक वेगळी जगण्याची पद्धत(way of life) अवलंबण्यासाठी, universal town खरंच असू शकतं, हे बघण्यासाठी, तर इथे यावंच इतकं हे ठिकाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. अर्थात मी मागे म्हणाले, तसं अनेक जण याला दोन दिवस जगायला ठीक आयुष्य, किंवा आदर्शवादी जीवन म्हणतील. असू शकेल. तरी एक प्रयोग म्हणून बघायला हे ठिकाण खचितच उत्तम आहे. तेवढाच आपल्या रोजच्या धकाधकीतून, कामातून, वैतागातून, ‘मजा करण्यातून’, ट्राफिक मधून, आणि  फेसबुक, इ-मेल मधून विरंगुळा. नाही का? ऑरोविल ची दारे कधीही उघडीच आहेत!   



Image courtesy- 
image 1- the Matrimandir- http://www.flickr.com/photos/infiknight/6795440348/
image 2- banyan and matrimandir-  http://whit-intothewoods.blogspot.in/



No comments: