Pages

Sunday, November 18, 2012

मरण सोहळा!

IndiBlogger - The Indian Blogger Community 

गेले  बरेच दिवस हा विषय लिहावं हे मनात होतं. आज टीव्ही वर दिवसभर बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेची दृश्य पहिली, तिथे लोटलेला जनसमुदाय पाहिला. त्या भव्य आणि टेलीव्हाईजड अंतिम सोहळ्या नंतर, त्यामुळेसुद्धा असेल, लिहायला बसल्यावर अचानक हा विषय उडी मारून वर आला. त्यामुळे त्याबद्दल आज काही.
चेन्नई मध्ये राहायला लागून मला आता एक वर्षं होत आलं. सुरुवातीच्या दिवसात शहर अनुभवण्याचा माझ्याकडून मी प्रयत्न केला, अजूनही करते.  हा अनुभव मला पाहायला मिळाला तो अगदी सुरुवातीच्या आठवड्यात. सिग्नलला एका लांबलचक ट्राफिक लाईन मध्ये आम्ही थांबलो होतो, आणि अस्पष्टसे ढोल ताशांचे सूर कानावर पडत होते.  "कमाल आहे, भर रस्त्यात संध्याकाळी ६ वाजताच्या अगणित ट्राफिक मध्ये कोणी कसली मिरवणूक कशी काढू शकतं?"  माझा वैतागलेला प्रश्न. काही वेळ गेल्यानंतर ते ढोल ताशांचे आवाज थांबले, आणि टेपरेकॉर्डरवर जोरात गाणी सुरु झाली. सगळीच गाणी अनोळखी भाषेतली, पण त्याचं धमाल बीट कळत होतं. आपल्याकडे पुण्यात गणपतीत विसर्जनाला साधारण रात्री एकच्या आसपास महत्वाचे गणपती गेल्यानंतर, रेकॉर्ड्स लावून  जो धुमाकूळ असतो, तसं साधारण भास होत होता. मी आणखीनच बुचकळ्यात पडले. आता कुठलाही सण नाही, मग हे कशाचे आवाज असावेत? काही वेळात थोडा ट्राफिक हलून त्या  मिरवणुकीच्या पुष्कळच जवळ मी पोहोचले. मिरवणुकीच्या अग्रभागी लोक फुलांच्या पाकळ्या उधळत  होते. अनेकांचे चेहरे गुलालाने माखले होते. मुक्तहस्ताने तरुण मुलं गुलाल उधळून, माखून नाचत होती. खरं तर त्यातले अनेक जण हे स्पष्टपणे दारूच्या अमलाखाली नाचत होते.  रेकॉर्ड गाण्यांवर अंग विक्षेप करत होते. जाणाऱ्यांना तोंडभर हसून दाखवत होते. मिरवणुकीत बायकाही होत्या, त्या देखील हास्य विनोद करत चालल्या होत्या. आमच्यावर देखील त्यांनी काही फुलं उधळली! हे सगळं झाल्यावर अखेर मागे या मिरवणुकीच कारण मला पहायला मिळालं. मागे  एम्ब्युल्न्समध्ये, नीट सजवलेल्या, अत्तर शिंपडलेल्या-  गाडीत- एक शव ठेवलं होतं!!!!!!!

मी आधी दचकले, आणि  एक पूर्ण मिनिट स्तब्ध झाले. ही सगळी हास्य विनोद आणि आनंदाची उधळण ही अंत्ययात्रेसाठी होती तर. त्या दिवसानंतर अनेकदा हे दृश्य मी चेन्नईच्या रस्त्यांवर पाहिलं. त्याची आता सवय झाली, त्यामुळे दचकायला किंवा स्तब्ध व्हायला होत नाही.  पण दर वेळी ते बघून एक विचित्र फिलिंग मनात येतं. भीती, त्रास, किळस किंवा वैताग, यांच्यापैकी काहीच नाही. कदाचित प्रश्नार्थक भावना. आता ह्या भावानेमागे कारण दोन असू शकतात. एक म्हणजे अंत्य यात्रेचं सार्वजनिक स्वरूप, आणि दुसरा म्हणजे  (ढोल ताशांच्या गजरात!) आनंद व्यक्त करणे. पैकी सार्वजनिक स्वरूपाने विचित्र वाटायचं काही कारण नाही. आत्ताच बाळासाहेबांची प्रचंड मोठी अंत्ययात्रा मी पाहिली. आणि तशा फक्त दिग्गजांच्याच नाही, तर सामान्य लोकांच्या अंत्ययात्रा आपल्याकडेही दिसतात. जितकी माणसं गेलेल्या माणसाने जोडली असतील, तितकी मोठी यात्रा.  बरं राहिलं सार्वजनिक रीतीने आपल्या भावना दाखवण, तर  तेरुदाली सारख्या चित्रपटांमध्ये आपण पाहिलं आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वरूप, accepted!

माझा हरकतीचा मुद्दा दुसरा होता. कोणीतरी, आपल्या जवळचं गेलेलं असताना आनंद व्यक्त करणं. आपल्याकडल्या अंत्ययात्रांमध्ये, अगदी दिखाऊ स्वरूपाच्या यात्रांमध्ये देखील लोक जास्तीत जास्त शोकाकुल दिसण्याचा प्रयत्न करत असतात. काळे चष्मे लावून आपले भाव लपवण्याचा. शुभ्र वस्त्रांमध्ये दु:खी होऊन वावरण्याचा. कदाचित कोणाच्याही मृत्यूने काही लोकांना आनंद होत असेलही, पण असं त्याचं प्रदर्शन हे आपल्याकडे कमालीचं गैर मानलं जातं. इतर धर्मांबद्दल माझा जास्त अभ्यास नाही, पण हिंदू परंपरेत तरी लोक धीर गंभीर असलेली मी पाहिली आहेत. असं असताना, इथे चेन्नईत हिंदू  माणसाच्या अंत्ययात्रेत हा आनंदोत्सव कसा आणि का?

काही  स्थानिक लोकांशी बोलल्यानंतर मला याचं कारण मिळालं. इथल्या संस्कृती मध्ये असं मानलं जातं, की माणसाचा मृत्यू ही दु:खद नसून,चांगली गोष्ट आहे. कारण त्या माणसाला या ऐहिक जगाच्या तापातून, यातनांमधून, विवंचनेतून मुक्ती मिळाली. तो जर खूपच भाग्यवान असेल, तर त्याची जन्ममृत्यू फेऱ्यातून देखील सुटका होईल, पण निदान या मर्त्य मानवांच्या दैनंदिन कटकटीतून तो सुटला, आणि स्वर्ग लोकाला प्राप्त झाला, त्यामुळे ती आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल  आनंद व्यक्त करून, त्याचं अनेक ठिकाणी प्रदर्शन करून तो प्रकट केला पाहिजे, असा काहीसा तो रिवाज आहे. गुलाल उधळून नाच करणे, मोठ्ठ्या आवाजात संगीत लावणे, फुलं उधळणे, या ज्या ज्या गोष्टीनी तो व्यक्त होईल, असं सर्व करणं हे त्यामुळे ओघाने आलंच. जाणाऱ्या माणसाला सुखाने, मन:शांतीने जाता यावं, त्याला मागे उर बडवणारे लोक राहिलेले दिसू नयेत, यासाठी देखील हे आहे.

हे कारण मला पहिल्यांदा ऐकल्यावर चमत्कारिक वाटलं.कदाचित मृत्यू आणि शोकाकुल वातावरण याची इतकी सवय आहे, की आपला दृष्टीकोन तसाच घडला आहे. नंतर विचार केल्यावर मला ते कारण आवडलं, आणि परत विचार केल्यावर ते परत चुकीचं वाटलं. ते अशासाठी, की ज्या व्यक्ती योग्य वयात मरण पावल्या नाहीत, लहान मुलं, तरुण व्यक्ती, खून झालेल्या, अपघाती मरण आलेल्या अश्या सर्व व्यक्तींना हा प्रकार एकाच मापात तोलतो. अश्या प्रसंगांमध्ये माणसाच्या जाण्याने कोणाला आनंद होत नाही, आणि त्याचे जगाचे भोग भोगून संपले आहेत, असंही नाही. मग अशा आनंद  प्रकटीकरणाने काय साध्य होतं? खरं तर माणूस योग्य वयात-सगळे भोग संपल्यावर गेला, तरी जवळच्यांना दु:ख होतंच. आणि ते झालेलं असताना, ते आतल्या आत ठेवून , सार्वजनिक रूपात हा आनंदोत्सव करण्याची सक्ती/अपेक्षा का?

खरोखर इथले सगळे लोक इतके पारलौकिकाला प्राप्त झाले आहेत, की या ऐहिक जगातून कुणीही गेल्याचा त्यांना आनंद वाटावा? का - बाकी सर्व सण समारंभ उत्सव संपल्यामुळे, किंवा त्यांचा कंटाळा आल्यामुळे हा नवीन प्रकार ह्या लोकांनी सुरु केला आहे? थ्रिल  म्हणून? असं असेल तर हे अजूनच भीषण आहे!

विचार करून सुद्धा मला कुठचीच बाजू योग्य वाटत नाही, पटत नाही, कळत नाही. मला तुमच्या प्रतिक्रिया सांगा. या अश्या प्रकारामागे काय कारण असेल, आणि ते किती योग्य आहे. तोवर जायचे जातील- पाहू- सोहळा- उरतील त्यांचा!



1 comment:

dfsk.wordpress.com said...

Read this post after a long time it was published. Somehow, had missed it before.

The incident you described is so strange! Adhi kadhi kuthey asa aiklach nahi ahey. You put forth good points regarding people who die before their time. Ashya veles tari ajibaat barobar vatat nahi ha prakaar.