Pages

Thursday, July 31, 2014

अपने होनेपे मुझको यकीन आ गया..लदाख हे एक वेगळंच प्रकरण  आहे. केवळ आधी पाहिलेल्या ठिकाणांपेक्षा वेगळं , अतिउंचावरचं ठिकाण म्हणून नव्हे, तर लदाखला घेतलेले अनुभव हे माझ्या नेहमीच्या जगण्यात मला न मिळणारे अनुभव आहेत. तसं म्हटलं तर आम्ही काही फार तीर मारले नाहीत- कुठल्यातरी भलत्याच दुर्गम जागी गेलोय, असं झालं नाही, किंवा ट्रेक केलाय असं झालं नाही. आम्ही आपले चार पर्यटकांसारखे सर्वात पॉप्युलर ठिकाणी गेलो, एखादा दिवस सोडता सोयीस्कर ठिकाणी राहिलो आणि चांगले गाडीतून फिरलो. तरीही हे वेगळे अनुभव कुठून मिळाले?
त्याचं कारण म्हणजे या सर्व प्रवासात स्वतःच्या अस्तित्वाची सतत होणारी जाणीव आणि त्यामुळे छेडल्या जाणारया डोक्यातल्या तारा.

काही काही गाण्यांच्या ओळी आपल्याला उगाच आवडतात. त्याच्या मागचा अभिप्रेत अर्थ आपल्याला दर वेळी कळतोच असं नाही.. पण त्यांचा नाद आवडतो. त्या ओळींचा अर्थ आपण वेळ प्रसंगी आपल्याला शक्य असा लावतो. तशा "उरले उरात काही आवाज चांदण्यांचे, आकाश तारकांचे, उचलून रात गेली.." या माझ्या आवडत्या ओळी आहेत. त्या ओळी इतके वर्ष ऐकल्यानंतर त्या प्रत्यक्ष मला दिसल्या लदाख मध्ये.
लडाखच्या उजाड, वैराण, निर्मनुष्य  परिसराचा एक फायदा म्हणजे तिथून दिसणारं आकाश. अवकाशनिरीक्षकांना पर्वणी म्हणावं लागेल असं आकाश तिथे रोज दिसतं. रात्री घराबाहेर येऊन आकाशात नजर टाकली की नजरबंदी होईल असं दृश्य असतं. इतके तारे, एकत्र, एका ठिकाणी, मी आयुष्यात कधीही पाहिलेले नाहीत. मला तारे वगैरे मधलं फार काही कळत नाही, पण आपले नेहमीचे लोक- ध्रुव, व्याधाचा बाण, सप्तर्षी वगैरे चटकन ओळखू येतात. लडाखच्या आकाशात मला एकही दिवस ते पटकन दिसले नाहीत- कारण आकाशातला ताऱ्यांचा खच. लाखो, करोडो तारे कोणीतरी आकाशात सांडून गेलं आहे, असं चित्र होतं.
असं आकाश माणसाला प्रचंड भावुक करतं. किंवा मंत्रमुग्ध म्हणू. असं आकाश आपल्याभोवती किती अद्भुत गोष्टी आहेत याची जाणीव करून देतं. हे तारे आपल्यापासून इतके दूर आहेत, तरीही दिसतात. पण खरं तर ते काही लाख प्रकाशवर्षे दूर आहेत, म्हणजे ते तिथे होते, आत्ता असतीलच असं नाही. आम्हाला आकाशगंगा दिसली, नुसत्या डोळ्यांनी, कोणतीही दुर्बीण न लावता. अशा किती आकाशगंगा आहेत?  पृथ्वीवर आपली सृष्टी आहे, बाकी कुठे असेल का?  हा पसारा नक्की किती मोठा आहे? आणि आपण कोण आहोत? या सगळ्या पसार्यात आपण कदाचित नगण्य बिंदू इतके देखील नसू, पण आपण आहोत.  या अफाट पसाऱ्यात हरवून जाण्याची शक्यता असताना देखील आपण आहोत. आपल्याला संवेदना आहेत, विचार आहेत, एक मन आहे, एक अस्तित्व आहे.

नुब्रा मधल्या शायोक नदीवरचं आकाश आणि pangong लेकच्या काठच्या तंबूबाहेरून पाहिलेलं आकाश, ही दोन्ही माझ्या मनात तशीच्या तशी आहेत, आणि त्यानुसार आलेले विचार देखील. त्यानंतर अनेक रात्री गेल्या, पुण्याला परत आल्यावर ते आकाश दिसणं बंद झालं, तरीही ते तारे तसेच आहेत. उरातले ते चांदण्यांचे आवाज मला ऐकू येतात, आणि त्या अनुषंगाने आलेले मूलभूत अस्तित्वाचे विचार देखील.

हाय आल्टीट्युड हे देखील आधी न अनुभवलेलं प्रकरण. समुद्रसपाटीपासून इतक्या उंचीवर, विरळ हवेत, श्वास घ्यायला हलकासा त्रास होतोच. कितीही त्या हवेची सवय झाली तरी. जगातल्या सर्वात उंचीवरच्या रस्त्यावर- खारदुंगला- साडेअठरा हजार फूट- असताना मी एक दहा सेकंद धावले- म्हणजे पटकन गाडीत बसण्यासाठी. त्या दहा सेकंद धावण्याने पुढचं एक मिनिट माझी काय अवस्था झाली, याचं मी वर्णन करू शकेन. माझा श्वास हा ऑन- ऑफ स्वीच सारखा आता बंद होईल, असं मला वाटत होतं. आपल्या श्वासावर आपलं नियंत्रण आणणं हा किती व्यर्थ प्रयत्न आहे, हे मला जाणवत होतं. त्या एका मिनिटात माझ्या डोळ्यासमोरून अनेक दृश्य झरकन सरकून गेली. आयुष्याच्या re-cap सारखी. मी डोळे मिटले, आणि ते मिटण्याच्या आधी मला दिसलेलं शेवटचं पर्वत शिखर माझ्या डोळ्यासमोर आलं. आता जर एका मिनिटानंतर आपण अस्तित्वात नसू, तर काय होईल, आणि श्वास असा स्वीच सारखा ऑफ झाला, तर आपलं अस्तित्व संपेल म्हणजे काय संपेल? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात आले. हे सगळं केवळ एका मिनिटात.
 प्रत्यक्ष एक मिनिटभरानंतरही मी जिवंत होते. मला धाप लागली होती, आणि मी दीर्घ श्वास घेत होते. गाडीतलं सुफी संगीत चालू होतं, माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते, आणि संवेदना जाणवत होत्या. आपण जिवंत असण्याची जाणीव मला त्या क्षणासारखी पूर्वी कधीही झालेली नाही. आपलं शरीर, त्यावरचं नियंत्रण, श्वासोच्छ्वासाची क्रिया, आपल्या जाणीवा, संवेदना जागृत असणं, हे सगळं त्या एका मिनिटानंतर फार प्रकर्षाने मला जाणवलं. आपल्या अस्तित्वाची खात्री पटली, असं म्हणायला हरकत नाही!   
आम्हाला श्रीनगर-लेह च्या वाटेत द्रास लागलं. द्रास पृथ्वीवरची अतिथंड जागा आहे. मानवी वस्ती असलेली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात थंड जागा. हिवाळ्यात उणे ६० अंश सेल्सिअस तापमानात लोक राहतात. अशा ठिकाणी आपल्या भारतीय सैन्याचं पोस्टिंग असतं. सियाचीन सारख्या जगातल्या सर्वात अवघड युद्धभूमीवर ते लढतात. जिथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आम्हाला श्वास घ्यायला हलकासा त्रास होत होता, अशा ठिकाणी युद्ध करतात. हे कसं होतं? खारदुंग-ला सारख्या ठिकाणी १८६५० फुटांवर सैन्य पहारा कसं करतं किंवा विरळ हवेत बीआरओचे लोक बांधकाम कसे करतात? मानव हा जगातला सर्वात जास्त adapt करू शकणारा प्राणी आहे, असं म्हणतातत्याचा अनुभव आम्ही घेत होतो. जगातल्या कुठल्याही नैसर्गिक  उणिवेशी सामना करून आपलं अस्तित्व establish करण्याची मानवी प्रवृत्ती आम्हाला तिथे दिसत होती. आपलं अस्तित्व कायम ठेवणं हे आपल्या हातात असतं, आपल्या कष्टांवर अवलंबून असतं याची प्रचीती आम्हाला तिथे मिळत होती.
पंगोंग लेक ही आमच्या अक्ख्या प्रवासातली सर्वात अवर्णनीय जागा आहे. तो तलाव जादूई आहे, असं माझं ठाम मत आहे. त्याचे रंग हे सूर्याप्रमाणे बदलतात, आणि त्याचा तो एक विशेष निळा रंग हा कशामुळे येतो मला माहिती नाही. नील-कुहर असंच त्याचं वर्णन करावं लागेल. स्फटिकासारखे नितळ निळे पाणी, त्यातल्या हलक्या लाटा, आणि त्याला चारही बाजूने असणारं तपकिरी डोंगराचं कोंदण.
अक्षरशः रडू येईल इतकं नैसर्गिक सौंदर्य. असं सौंदर्य जेव्हा तुमच्या समोर येतं, तेव्हा तुम्ही आधी स्तंभित होता, आणि मग शांत. समुद्रसपाटीपासून १४५०० फुटांवर, कुठेतरी जगाच्या एका कोपऱ्यात असं सौंदर्य आहे, आणि ते तुम्ही तुमच्या डोळ्याने बघू शकता आहात. पाण्याच्या जवळ खूप आपलंसं वाटलं, डोंगरांच्यापेक्षाही जास्त. आपल्या सर्वांची उत्पत्ती पाण्यापासून झाली असं मी कुठेतरी ऐकलंय. अनेक डोंगर पालथे घालून शेवटी पाण्यापाशी आल्यामुळे तो कनेक्ट जाणवला असेलही. आपल्या मूळ स्थानाशी आल्यावर, किंवा घरी आल्यावर जसं वाटतं तसं. या ठिकाणी जर माझं काही बरंवाईट झालं असतं, तरी मला काही वाईट वाटलं नसतं, इतकी मी त्या पाण्याच्या दर्शनाने तृप्त होते. सिंधू आणि झंस्कार नद्यांचा संगम आणि खळाळत्या शायोक नदीच्या काठावर देखील मला असंच तृप्त वाटलं होतं. आपण मूलतः कसे उत्पन्न होतो , मानसिक किंवा आत्मिक दृष्ट्या कसे उन्नत evolve होतो, आणि आपलं काय होणार आहे, कल्पना नाही, पण आपलं अस्तित्व आहे, आणि निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांचाशी आपला खोलवर संबंध आहे हे नक्की.

हे चार प्रसंग सोडूनही अशा अनेक वेळा ह्या प्रवासात  होत्या, की जिथे मला आपलं स्वतःचं माणूस म्हणून अस्तित्व प्रकर्षाने जाणवलं. विचारांना मुक्त सोडता आलं, शांतता आणि शांती याचा अनुभव घेता आला. निसर्गापेक्षा आपण किती छोटे आहोत, आपण निसर्गासोबत जुळवून कसे घेवू शकतो, आणि तरीही निसर्ग ही आपल्यापेक्षा एक भव्य, उदात्त शक्ती कायमच राहणार आहे, हे मला लक्षात आलं..
जावेद अख्तर यांचे ऐकलेले शब्द पुरेपूर अनुभवले:
बस मै हू, मेरी सासें है और मेरी धडकने..
ऐसी गहराईया, ऐसी तनहाईया,
और मै, बस मै.

अपने होनेपे मुझको यकीन आ गया.

2 comments:

shiwanee parimal said...

Brilliant write up sneha. It's a sheer poetry what you have written. Well composed presentation of emotions that are so overwhelming. Keep writing!

satishchandra gore said...

surekh. pan ajun barach kahi avyakta ahe as watat. te pan lihi. ek lagun photo blog pan kar. mast.